एसटी लिपिक भरती घोटाळा: विभाग नियंत्रक भगवान जगनोर तडकाफडकी कार्यमुक्त; चार्जशीट देत गंभीर कारवाई
जळगाव | दि 10 जुलै, प्रतिनिधी महान्युज 18
एसटी महामंडळाच्या जळगाव विभागात लिपिक टंकलेखक भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे संपूर्ण एसटी व्यवस्थापन हादरले असून, विभाग नियंत्रक भगवान शंकर जगनोर यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. या कारवाईचे आदेश एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी 9 जुलै 2025 रोजी जारी केले आहेत. त्यांचा पदभार धुळे विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी घेतला आहे.
▶ मुख्यमंत्री व विरोधकांपुढे तक्रारीनंतर कारवाईची गती
कामगार सेनेचे प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील यांनी 25 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भरती घोटाळ्याची तक्रार केली होती. त्यावरून सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक जाधव यांनी सखोल चौकशी करत अहवाल मुंबईला पाठवला होता. त्याच अहवालाच्या आधारावर विभाग नियंत्रकावर ही कारवाई करण्यात आली आहे.
▶ महिला वाहकावर दबाव; लिपिकाची बदली
चौकशी दरम्यान पीडित महिला वाहक व आस्थापना शाखेतील लिपिक व अधिकाऱ्यांचे जबाब घेतले गेले. या दरम्यान पीडित महिला कर्मचाऱ्यावर दबाव तंत्राचा वापर झाल्याची तक्रारही समोर आली. त्यानुसार लिपिक प्रीतम पाटील यांची बदली जामनेर येथे करण्यात आली होती.
▶ भ्रष्टाचार निवारण समितीचा आक्रमक पवित्रा
या प्रकारात दोषींवर तात्काळ कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करत आमरण उपोषणाचा इशारा भ्रष्टाचार निवारण समितीचे अध्यक्ष सुरेश चांगरे आणि सचिव दिलीप सूर्यवंशी यांनी दिला होता. या मागणीनंतर विभाग नियंत्रकावर चार्जशीट दाखल करत थेट कार्यमुक्तीची कारवाई करण्यात आली.
▶ भरती प्रक्रियेत पैसे; मोबाईल संभाषणांमुळे उघड झालं सत्य
भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून PhonePe द्वारे पैसे मागण्यात आले होते, ही बाब चौकशी अधिकाऱ्यांसाठी महत्वाची ठरली. याशिवाय लिपिक व उमेदवार यांच्यातील मोबाइल संभाषणांमधूनही आर्थिक व्यवहार सिद्ध झाले. आवक-जावक रजिस्टरमध्ये नियमबाह्य नोंदी आढळल्या असून, पदोन्नतीची पत्रे मागील तारीख टाकून देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
▶ बस स्थानकावर पेढे वाटून मुख्यमंत्र्यांचे आभार
या घोटाळ्यावर विधान परिषदेत आवाज उठवणाऱ्या एकनाथराव खडसे व मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी भ्रष्टाचार निवारण समितीने जळगाव बस स्थानकात कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
▶ आणखी गंभीर तक्रारींची नोंद.
सुरक्षा व दक्षता खात्याकडे वैद्यकीय अपात्र कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गंभीर स्वरूपाची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. यामुळे एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातील भ्रष्टाचाराचे पुन्हा एकदा गंभीर स्वरूप समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.