राज–उद्धव ठाकरे एकत्र! हिंदी सक्तीविरोधात मोठा मोर्चा; बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीकडे पाऊल.
मुंबई | 29 जून २०२५, प्रतिनिधी…
महाराष्ट्रात शालेय शिक्षणात हिंदी भाषा तिसऱ्या भाषेप्रमाणे सक्तीने शिकवण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेने ६ जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना-उबठाकडून ७ जुलै रोजी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
❝भाषिक आणीबाणी लादली जात आहे❞ – उद्धव ठाकरे
शिवसेना (उबठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की, “हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न म्हणजे भाषिक आणीबाणीच आहे.” त्यांनी पालक, शिक्षक, आणि शैक्षणिक संस्थांशी चर्चा न करता निर्णय घेण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
राज ठाकरे यांचा मोर्चा ‘गैरराजकीय’!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ जुलै रोजी गिर्गाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. “हा मोर्चा कोणत्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय असणार आहे. मराठी भाषेसाठी सर्वांनी एकत्र यावे,” असं राज ठाकरेंनी आवाहन केलं आहे.
बाळासाहेबांच्या विचारांची आठवण
शिवसेना-उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले की, “उद्धव आणि राज ठाकरेंचं एकत्र येणं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पुन्हा जागृत होण्याची सुरुवात आहे.”
महत्वाचे मुद्दे:
- शालेय शिक्षणात हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंचा आक्रमक विरोध.
- ६ व ७ जुलै रोजी अनुक्रमे मनसे व शिवसेना (उबाठा)चे मोर्चे
- शिक्षण धोरणाविरोधात ‘मराठी अस्मिता’चे आंदोलन तेजीत