एप्रिल वेतन वेळेत; एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून ४१६ कोटींचा दिलासा
मुंबई 6 मे 2025 प्रतिनिधी- महान्युज 18
Employees Salary news : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. एप्रिल महिन्याचे वेतन वेळेवर देण्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळाला ४१६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी अदा केला आहे. हा निधी मार्च महिन्यातील सवलत मूल्याच्या स्वरूपात प्रदान करण्यात आला असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे ७ तारखेला देणे शक्य होणार आहे.
राज्यातील २५० एसटी आगारांमध्ये सध्या सुमारे ८७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. दर महिन्याला निश्चित तारखेला वेतन मिळावे ही कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, मागील काही महिन्यांपासून वेतन वितरणात सातत्याने विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागले. Employees Salary
या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच आश्वासन दिले होते की, कर्मचाऱ्यांचे वेतन आता वेळेत दिले जाईल. त्यानुसार हालचाली गतीने सुरू झाल्या असून सरकारने मार्च महिन्याचे सवलत मूल्य महामंडळाकडे वर्ग केले आहे.
राज्य सरकारकडून प्राप्त निधीमुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना ७ मे रोजीच वेतन मिळण्याची शक्यता असून, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे. Employees Salary